बुमराहला आराम, रोहित अनफिट? अफगाणिस्तानविरुद्ध ‘या’ 15 खेळाडूंना संधी
मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका पुढील महिन्यात सुरू होणार आहे. मालिकेला अजून थोडा अवकाश असला तरी तयारीला आतापासूनच वेग आला आहे. आधी एक कसोटी सामना आणि त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. लवकरच भारतीय संघाची घोषणाही होणार असून, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ कसा असू शकतो, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी त्यांच्या सोबत आणखी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. विशेषतः जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या वनडे मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे आयपीएल सामनेही खेळत नाहीये. त्यामुळे पूर्ण फिटनेस मिळेपर्यंत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. दुसरीकडे बुमराह फिट असला तरी आयपीएलमध्ये सलग सामने खेळल्यानंतर त्याच्यावर अतिरिक्त ताण न देण्याचा विचार बीसीसीआय करू शकते. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्याची शक्यता जास्त मानली जाते.
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासोबत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचेही संघातील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. हार्दिक पांड्या अनुपस्थित राहिल्यास अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांना मोठी संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजीत कुलदीप यादव महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजवर असण्याची शक्यता आहे. त्याला अर्शदीप सिंगची साथ मिळू शकते, तर युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला देखील संधी दिली जाऊ शकते. याशिवाय संजू सॅमसनला बॅकअप ओपनर म्हणून संघात स्थान मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा.




