पावसाने केला सामना रद्द तरीही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी

पावसाने केला सामना रद्द तरीही  भारतीय संघासाठी आनंदाची बातमी

Cricket Match News - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी - २० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र सामना रद्द झाला असला तरी भारतीय संघासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण भारताने मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर भारताने दमदार पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला आणि मालिकेत २ - १ अशी आघाडी मिळवली.

पाचव्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला जोरदार सुरुवात दिली. अभिषेकने १३ चेंडूंमध्ये नाबाद २३ धावा केल्या, तर शुभमन गिलने १६ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह नाबाद २९ धावांची खेळी केली. भारताने ४.५ षटकांत ५२ धावा केल्या होत्या आणि दोनशे धावांचा टप्पा गाठेल असं वाटत असतानाच पाऊस आला. पावसाचा जोर वाढल्यामुळे सामना अखेर रद्द करावा लागला.

जरी हा सामना अपुरा राहिला असला, तरी भारताने २ - १ अशा फरकाने मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत पराभूत केले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही मालिका जिंकत दमदार कामगिरी सादर केली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणं हे भारतीय क्रिकेटसाठी मोठं यश ठरलं आहे.