मुस्लिम अभिनेत्रीने केली हिंदू पद्धतीने पूजा; ट्रोलिंगनंतर दिलं सडेतोड उत्तर

मुस्लिम अभिनेत्रीने केली हिंदू पद्धतीने पूजा; ट्रोलिंगनंतर दिलं सडेतोड उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) :बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सौंदस मौफाकिर सध्या तिच्या नव्या स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँड लॉन्चपेक्षा तिच्या घरी झालेल्या हिंदू पद्धतीच्या पूजेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.नव्या व्यवसायाच्या शुभारंभानिमित्त सौंदसने पारंपरिक विधीनुसार पूजा केली. यावेळी तिने ब्राह्मण पुजाऱ्याच्या उपस्थितीत आरती केली आणि संपूर्ण टीमसोबत नव्या प्रवासासाठी ईश्वराचे आशीर्वाद घेतले. पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिने आपल्या ब्रँडच्या यशासाठी आणि टीमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले.

मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. "मुस्लिम असून हिंदू पद्धतीने पूजा का?" असा सवाल अनेकांनी केला.या टीकेला उत्तर देताना सौंदसने स्पष्ट सांगितले की, तिला तिच्या मुस्लिम धर्माचा अभिमान आहे आणि तो तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण तिच्या टीममध्ये विविध धर्मांचे सदस्य आहेत. त्यांच्या श्रद्धेचा आदर करण्यासाठी आणि नव्या सुरुवातीच्या आनंदात प्रत्येकाला सहभागी करून घेण्यासाठी ही पूजा आयोजित करण्यात आली होती.

तिने पुढे म्हटलं की, जसं तिचे सहकारी तिच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करतात, तसंच तीही त्यांच्या श्रद्धांचा सन्मान करते. तिच्या मते, खरी टीम तीच असते जिथे धर्मापेक्षा परस्परांचा आदर आणि विश्वास अधिक महत्त्वाचा असतो.दरम्यान, 'एमटीव्ही रोडीज', 'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला' आणि 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेली सौंदस मौफाकिर यापूर्वी 'फतेह' आणि 'द केरळ स्टोरी'सारख्या प्रोजेक्ट्समध्येही झळकली आहे.

सौंदसच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्यावर टीका कायम ठेवली. मात्र, सर्व धर्मांचा आदर करण्याचा तिचा संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.