सलमान खानला मिळाले न्यायालयात हजर राहण्याचे आदेश ; नेमकं प्रकरण काय..?
मुंबई - बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान आज 60 वा वाढदिवस साजरा करत असतानाच तो पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. पनवेल येथील फार्महाऊसवर जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, राजस्थानमधील कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खानला थेट न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण एका पान मसाल्याच्या जाहिरातीशी संबंधित असून, त्यात आता बनावट स्वाक्षरीचा गंभीर आरोपही जोडला गेला आहे.

कोटा ग्राहक न्यायालयात सुरू असलेले हे प्रकरण ‘राजश्री पान मसाला’ या ब्रँडच्या जाहिरातीभोवती फिरत आहे. या जाहिरातीत पान मसाल्यात ‘वेलची आणि केशर’ असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या ब्रँडचा अॅम्बेसेडर सलमान खान असल्याने त्याच्यावरही जबाबदारी निश्चित होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाला नवे वळण मिळाले ते खोट्या स्वाक्षरीच्या आरोपामुळे. 9 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदार आणि राजस्थान उच्च न्यायालयातील वकील इंद्र मोहन सिंह यांनी दावा केला की, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीवरील तसेच सलमान खानच्या वतीने दाखल उत्तरावरील स्वाक्षरी ही त्याची नाही. त्यांच्या मते, जोधपूर कारागृह व इतर न्यायालयीन कागदपत्रांवरील सलमानच्या मूळ स्वाक्षऱ्या आणि कोटा न्यायालयात सादर कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्यांमध्ये मोठा फरक आढळतो.
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारी 2026 रोजी ठेवली असून, स्वाक्षरींच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. ग्राहकांची दिशाभूल झाल्याचा संशय असल्याने न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, पान मसाल्याच्या जाहिरातीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. बाजारात केशराची किंमत लाखोंमध्ये असताना अवघ्या पाच रुपयांच्या पाऊचमध्ये केशर असल्याचा दावा कसा करता येतो, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे. अशा जाहिरातींमुळे तरुणांवर चुकीचा प्रभाव पडतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात सलमान खानसोबतच संबंधित कागदपत्रांचे नोटरीकरण करणारे वकील आर. सी. चौबे यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीत आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 20 जानेवारीच्या सुनावणीत येणारा FSL अहवाल सलमान खानसाठी दिलासादायक ठरणार की अडचणी वाढवणारा, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. वाढदिवसाच्या दिवशीच भाईजानची ही ‘कोर्टरूम स्टोरी’ बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.




