'KGF' आणि 'कांतारा' ला टक्कर देणारा 'हा' सिनेमा बॉक्स ऑफीसनंतर ओटीटीवर धूमाकूळ घालतोय
मुंबई - सध्या एक कन्नड चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरलाय. 'केजीएफ' आणि 'कांतारा' सारख्या सुपरहिट चित्रपटांना टक्कर देणारा हा सिनेमा थिएटरमध्ये कमाल गाजल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा धूमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतय. या सिनेमाचं नाव आहे 'Su From So'. हा एक हटके हॉरर - कॉमेडी चित्रपट असून, त्यातील थरारक ट्विस्ट प्रेक्षकांची पूर्णपणे झोप उडवत आहेत. सध्या हा सिनेमा JioCinema (पूर्वी Jio Hotstar) वर ट्रेंड करत आहे. २५ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने मोठ्या प्रमोशनशिवायही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता राज बी. शेट्टी यांनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत नेलं आहे. IMDb वर मिळालेलं 8.5 रेटिंग हा त्याच्या यशाचा पुरावा आहे.

‘Su From So’ या चित्रपटात एका गावाची कथा दाखवण्यात आली आहे. जिथे प्रेम, एकोपा आणि अंधश्रद्धा यांचं मिश्रण आहे. गावकरी एका प्रतिष्ठित व्यक्ती ‘अण्णा’ कडे आपले प्रश्न घेऊन जातात. अशोक नावाचा युवक एका मुलीवर प्रेम करतो, पण लवकरच गावात अफवा पसरते की त्याला भूत झपाटलं आहे. कथेत ‘प्रकाश’ हे पात्रही महत्त्वाचं असून त्यालाही ‘सुलोचना’ नावाच्या आत्म्याचा छळ होतो. विनोद, भय आणि एक सामाजिक संदेश यांचं उत्तम मिश्रण या चित्रपटात पहायला मिळतं.
केवळ ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने भारतात ९० कोटी आणि जगभरातून तब्बल १२१ कोटींचं कलेक्शन केलं आहे. थिएटरमध्ये ४१ दिवस चालल्यानंतर, आता ओटीटीवरही हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या हा चित्रपट कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. हिंदी आणि तमिळ प्रेक्षकांना मात्र थोडं अधिक वाटावं लागेल, कारण या भाषांमधील डब व्हर्जन्स लवकरच रिलीज होणार आहेत.
'Su From So' हा एक अनुभव आहे ज्यामध्ये भय, विनोद आणि उत्कंठेने भरलेला. जर तुम्ही वेगळ्या धाटणीचा सिनेमा पाहायचा विचार करत असाल, तर हा चित्रपट नक्कीच तुमच्या यादीत असायला हवा.




