विधानपरिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध; उर्वरित 12 ठिकाणी महायुती विरुद्ध मविआ, नाशिकमध्ये दराडे-गीते यांच्यात थेट लढत
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या दिवशी राज्यभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांसमोर महाविकास आघाडीनं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मविआच्या काही उमेदवारांनी संख्याबळाचं कारण, मित्रपक्षांचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत माघार घेतली. तर, महायुतीच्या नेत्यांना देखील बंडखोरांना शांत करण्यात यश आलं.

नितेश राणे थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण विधानपरिषदेचे उमेदवार बाळ माने यांना अर्ज मागं घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर, नाशिकमध्ये गोकुळ गीते अर्ज माघारीवरुन चर्चेत राहिले, तर गणेश गीते यांनी सकाळीच अर्ज मागं घेणार असल्याचं स्पष्ट केलं. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या, यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर भाजपनं बिनविरोध विजय मिळवला.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रायगडमध्ये महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बाळ माने मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेकापच्या अरविंद म्हात्रे यांच्याकडून अर्ज मागं घेण्यात आला. पक्षविरोधी कारवाईमुळं बाळ मानेंची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं. या मतदारसंघात अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले.




