खासदारांच्या फुटीनंतर NDAचं संख्याबळ वाढलं; लोकसभेत ३६२ च्या 'मॅजिक फिगर'पासून किती दूर?
दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३६२ च्या 'मॅजिक फिगर'ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि उद्धव ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी NDAचे संख्याबळ वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे NDA दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचली आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सध्या लोकसभेत भाजपाचे २४० खासदार आहेत. NDAतील इतर घटक पक्षांसह हा आकडा २९३ वर पोहोचतो. लोकसभेतील तीन जागा रिक्त असल्याने प्रभावी सदस्यसंख्या ५४० इतकी असून दोन-तृतीयांश बहुमतासाठी ३६० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक मानला जात आहे.राजकीय घडामोडींमध्ये TMCच्या २० खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या संख्येची NDAच्या विद्यमान २९३ सदस्यांमध्ये भर पडल्यास आकडा ३१३ वर जातो. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटातील ६ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास NDAचे संभाव्य संख्याबळ ३१९ पर्यंत पोहोचू शकते.
याशिवाय समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षातील संभाव्य फुटीबाबतही राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मात्र समाजवादी पक्षाने अशा शक्यतांचे स्पष्टपणे खंडन केले आहे.दरम्यान, तामिळनाडूमधील DMKकडे लोकसभेत २२ खासदार आहेत. भविष्यात या खासदारांनी सरकारला पाठिंबा दिल्यास NDAचे संख्याबळ ३४२ पर्यंत जाऊ शकते. तरीही दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३६० किंवा ३६२ च्या आकड्यापासून आघाडी अद्याप काही अंतरावर असल्याचे दिसते.सध्या विरोधी पक्षांकडे काँग्रेससह सुमारे १८४ खासदार आहेत. त्यामुळे लोकसभेतील आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




