अजित पवारांच्या निधनानंतर NCP मध्ये वाढली नाराजी? सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरच प्रश्न
मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी गेल्यानंतर आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस बजावत ही निवड पक्षाच्या संविधानानुसार झालेली नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षात सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, सच्चिदानंद सिंह यांनी याआधीही पत्र आणि चर्चेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. मात्र, पक्षातील संवादाच्या अभावामुळे त्यांच्या शंकांचं समाधान होऊ शकलं नाही. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न झाला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला किंवा व्यक्तिमत्त्वाला कोणाचाही विरोध नाही. पक्षातील सर्वजण त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. मात्र, पक्षाच्या संविधानात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार त्यांची अधिकृत निवड व्हावी, एवढीच पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे हा वाद व्यक्तीविरोधात नसून प्रक्रियेबाबत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, अजित पवार पक्षसंघटना आणि सरकार यांच्यातील समन्वय अतिशय प्रभावीपणे सांभाळत होते. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते यांच्याशी त्यांचा सतत संपर्क असायचा. त्यामुळे कोणताही वाद किंवा गैरसमज फार काळ टिकत नसे. मात्र त्यांच्या निधनानंतर ही संवादाची साखळी तुटल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आज पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. नियमित बैठका, चर्चा आणि संवादाचा अभाव असल्यामुळे नाराजी वाढत आहे. पक्षात नव्या नेतृत्वाला संधी मिळाली असली तरी संघटना चालवताना सातत्याने समन्वय आणि संवाद ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं, याची जाणीव सर्वांना असावी, असंही त्यांनी म्हटलं.
ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पुढे असा दावाही केला की, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांमध्येही आवश्यक तितका संवाद होत नसल्याने अनेक निर्णयांबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची वेळेत उत्तरं मिळत नाहीत आणि त्यातूनच असंतोष वाढतो.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे. हा वाद केवळ अध्यक्षपदाच्या निवडीपुरता मर्यादित राहतो की पक्षसंघटनेत मोठे बदल घडवून आणतो, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.




