इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली, तिकडे भाऊही बैठकींना हजेरी; सुनील अहिरही ठाकरेंची साथ सोडणार?
मुंबई (प्रतिनिधी) : आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे योगदान असणाऱ्या सचिन अहिर यांना काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटात घेतले. सचिन अहिर यांना विधानपरिषदेचे उपसभापतीपद देत शिंदे यांनी ठाकरेंचा विश्वासू मोहरा अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले होते. यानंतर ठाकरे गटाने बेस्ट समितीचे सदस्यपद दिलेले सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर हे देखील आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

सुनील अहिर यांनी अलीकडेच मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. सुनील अहिर हे वारंवार शिंदे सेनेच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहताना दिसून आले आहेत. मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांच्याकडून सुनील अहिर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सुनील अहिर यांची बेस्ट समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून ठाकरे गटाकडून नियुक्ती करण्यात आली होती. सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी अहिर कुटुंबीयांना देण्यात आलेल्या पदांची यादी वाचून दाखवली होती.
सचिन अहिर यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर सुनील अहिरदेखील राजीनामा देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अजूनही सुनील अहिर ठाकरे सेनेकडून बेस्ट समितीवर सदस्य आहेत. त्याचवेळी ते उघडपणे शिंदे गटाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.सचिन अहिर यांना पक्षात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मुंबईतील पक्षबांधणीची मोठी जबाबदारी सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच विधानभवनात शिंदे सेनेच्या नगरसेवकांची सचिन अहिर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
राज्यभरात भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्के दिले असले तरी मुंबईतील ठाकरे गटाचा बालेकिल्ला अजूनही भक्कम असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आले होते. भाजपला मुंबईत चांगले यश मिळाले असले, तरी शिंदे सेनेला अपेक्षित यश मिळाले नव्हते.त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या राजकारणाची खाचाखोच माहिती असलेल्या आणि ग्राऊंड लेव्हलवरील कार्यकर्त्यांशी संपर्क असलेल्या सचिन अहिर यांच्याकडे पक्षबांधणीची सूत्रे सोपवली आहेत.
याआधी मुंबईची जबाबदारी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे होती. मात्र, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने शिंदे यांनी सचिन अहिर यांच्यावर ही जबाबदारी सोपवत मुंबईसाठी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.त्यामुळे सचिन अहिर यांनी शिंदे सेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधून त्यांच्या प्रभागातील प्रश्न समजून घेण्यास सुरुवात केली आहे. आता सचिन अहिर यांच्यानंतर सुनील अहिरही ठाकरेंची साथ सोडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




