"फडणवीस-गडकरींची 'छाटाछाटी' सुरू आहे का? उद्धव ठाकरेंचा संघाला थेट सवाल; मुख्यमंत्र्यांवरही निशाणा"

"फडणवीस-गडकरींची 'छाटाछाटी' सुरू आहे का? उद्धव ठाकरेंचा संघाला थेट सवाल; मुख्यमंत्र्यांवरही निशाणा"

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत पक्षांतर्गत "छाटाछाटी" सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी संघालाच थेट प्रश्न विचारला.उद्धव ठाकरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांनाही संघाचा पाठिंबा आहे. मग तुम्हाला मान्य असलेला नेता पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरू आहे का? याचं उत्तर संघाने द्यायला हवं."

त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पूर्वीच्या विधानाचाही उल्लेख केला. "भाजपला आता संघाची गरज नाही, असं नड्डा म्हणाले होते. मग संघालाही हे सगळं मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचाही उल्लेख करत, "बाळासाहेब ठाकरे ही केवळ व्यक्ती नव्हती, तर तो एक विचार आहे. तो विचार प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानात जिवंत आहे. कितीही प्रयत्न झाले तरी तो संपवता येणार नाही,"असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या "मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार?" या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "हा एक वाक्प्रचार आहे. मराठी समजत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडून मराठी शिकावी,"असा टोला त्यांनी लगावला.याशिवाय मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्री स्वतःच्या ताकदीवर झालेले नाहीत. दिल्लीच्या नेतृत्वाच्या कृपेवर ते त्या खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागत आहेत,"असा दावा त्यांनी केला.