"तीनदा साईबाबांची शपथ..तरी 100 कोटींसाठी गद्दारी? संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर घणाघात!"
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.अशातच शिर्डीमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले की, "या मतदारसंघाचा खासदार एक नंबरचा बदमाश आहे. एकदा गद्दारी करून परत आला, माफी मागितली आणि खासदार झाला. पण आता पुन्हा 100 कोटींसाठी विकला गेला."यावेळी त्यांनी एक गंभीर दावा करत सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी शंका व्यक्त केल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली होती. तरीही त्यांनी पक्ष सोडल्याचा आरोप राऊतांनी केला.
राऊत यांनी पुढे म्हटले की, "भाऊसाहेब वाकचौरे यांना खासदार करण्यासाठी पक्षाने पैसा खर्च केला, शिवसैनिकांनी जीव तोडून प्रचार केला. मात्र त्यांनी पक्षाशी गद्दारी केली."याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत,"वाकचौरेसारखे लोक येतील आणि जातील, पण शिवसेना कायम राहील. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ उठले असून गद्दारांना जनता धडा शिकवेल," असा इशाराही दिला.




