महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंचा सर्वधर्मीय सणांसाठी स्थायी आदेश

महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंचा सर्वधर्मीय सणांसाठी स्थायी आदेश

मुंबई (प्रतिनिधि) : सण-उत्सवांच्या काळात भाविक आणि नागरिकांना दिला जाणारा महाप्रसाद, लंगर किंवा भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या थेट रडारवर असणार आहे. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा महत्त्वाचा आणि सर्वधर्मीय सणांना लागू होणारा निर्णय जाहीर केला आहे.या नियमानुसार महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभर लागू राहणारा असा स्थायी आदेश जारी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

वार्षिक कॅलेंडर आणि सणांचे तीन स्तर

सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मटण आणि चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात अन्नभेसळीची शक्यता देखील वाढते. ही बाब लक्षात घेऊन एफडीएने वर्षभराचे सणांचे कॅलेंडर तयार केले असून, सर्व सणांचे तीन स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.

प्रथम श्रेणी – राज्यव्यापी: गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या.

द्वितीय श्रेणी – प्रादेशिक: मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.

तृतीय श्रेणी – स्थानिक: स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस.

चार टप्प्यांत होणार कारवाई

अन्न तपासणीची प्रक्रिया सणाच्या 21 दिवस आधी सुरू होणार असून, सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. एकूण चार टप्प्यांमध्ये ही कारवाई केली जाईल.

पहिला टप्पा – पूर्वतयारी: हाय-रिस्क अन्नपदार्थांचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना आधीच सूचना देणे.

दुसरा टप्पा – नाका तपासणी: गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवले जाईल. पहाटेच्या वेळेत विशेष नाका तपासणी केली जाणार आहे.

तिसरा टप्पा – सणाचा दिवस: विशेष भरारी पथकांकडून प्रत्यक्ष ठिकाणी सरप्राईज तपासणी करण्यात येईल.

चौथा टप्पा – कायदेशीर कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर खटले दाखल करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल.

अन्नपदार्थांनुसार ‘हाय रिस्क’ तपासणी

उपवासाचे पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांचे आधीच नमुने घेतले जातील. बुरशीजन्य पदार्थांवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

मांस, पाणी आणि बर्फाच्या बाबतीत स्वच्छता, शीत साखळी म्हणजेच Cold Chain आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासली जाणार आहे.

मिठाईवरील सजावटीसाठी वापरला जाणारा चांदीचा वरख खरोखर शुद्ध चांदीचा आहे का, तसेच खाद्यरंगांचा वापर मर्यादेत आहे का, याचीही तपासणी केली जाईल.

याशिवाय अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, नाताळच्या काळातील बेकरी उत्पादने तसेच रमजान आणि ईदच्या काळातील विशेष खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.

‘झिरो टॉलरन्स’ धोरण

ई-कॉमर्स, आयात केलेले अन्नपदार्थ, बेकरी आणि पॅकबंद पाणी यांच्यावरही एफडीएकडून कडक नजर ठेवली जाणार आहे. ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवून सण-उत्सवांच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. सण संपल्यानंतर 14 दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींविरोधात न्यायालयात खटले दाखल केले जातील. यापुढे प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची आवश्यकता राहणार नाही. हा स्थायी आदेश संपूर्ण वर्षभर लागू राहणार असून, सर्वधर्मीय सणांमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एफडीएकडून नियमित कारवाई केली जाणार आहे.