पत्नीने जेवण बनवण्यास नकार दिल्याने पतीचा संताप, मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

पत्नीने जेवण बनवण्यास नकार दिल्याने पतीचा संताप, मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

नागपूर (प्रतिनिधी) : नागपुरात कौटुंबिक वादातून 38 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीतील डान्स क्लासला जाण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचं नाव यामिनी कृष्ण लाल यादव असून आरोपी पतीचं नाव कृष्ण लाल यादव आहे. पोलिसांनी कृष्ण लालला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत.

 पोलिसांच्या माहितीनुसार, कृष्ण लाल कामावरून घरी आल्यानंतर त्याने पत्नी यामिनीला स्वतःसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवण्यास सांगितलं. मात्र, यामिनी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या डान्स क्लासला जाण्याच्या तयारीत होती. तिने स्वयंपाक करण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत गेला आणि कृष्ण लालने यामिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कृष्ण लाल मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन मुलांसमोरच त्याने यामिनीच्या मानेवर आणि पोटावर मारहाण केल्याचं तपासात समोर आलं आहे.

 मारहाणीनंतर यामिनीला मानेत आणि पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती बिघडत असल्याने तिने पतीला पेनकिलर आणण्यास सांगितलं. कृष्ण लाल औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेला, मात्र दुकान बंद असल्याने तो औषध न घेताच परतला. दरम्यान, यामिनीची प्रकृती आणखी खालावत गेली. तिच्या पोटाला सूज आली आणि दुखापतींचा त्रास वाढत गेला. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, शरीरात झालेल्या गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 सुरुवातीला या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात यामिनीच्या शरीरावर गंभीर दुखापती आढळून आल्याची माहिती आहे. मानेचं हाड मोडल्याचं, तसेच आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याचं अहवालातून समोर आलं. यानंतर पोलिसांनी कृष्ण लालची चौकशी केली. तपासाअंती त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.