नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ही सामूहिक जबाबदारी

नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ही सामूहिक जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात होर्डिंग लावत, "दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा," अशी मागणी केली आहे. या होर्डिंगनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले, गिरीश महाजन यांनी जबाबदारीने हे विधान केले आहे. त्यांच्याकडे कुंभमेळ्याचीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकारचे लक्ष कुंभमेळ्याकडे आहे. मात्र, सरकारमध्ये कोणत्याही एका व्यक्तीची नव्हे तर सामूहिक जबाबदारी असते. एकत्रितपणे काम करून हा प्रश्न सोडवला जाईल.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय महायुतीतील तिन्ही नेते लवकरच घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी प्रत्येक पक्षाने मागणी करणे स्वाभाविक असले तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असेल, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समाजाच्या आणखी काही मागण्या असतील, तर त्यांचाही सकारात्मक विचार केला जाईल.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता त्यांनी, त्या नेमक्या कोणत्या संदर्भात बोलल्या हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपत सर्व पक्षांनी विकासाच्या राजकारणासाठी एकत्र काम करायला हवे, असे मत व्यक्त केले.