कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद? भास्कर जाधवांचा टोला; नार्वेकरांना अध्यक्षपदाचं भान नसल्याची टीका
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे. आजही या प्रकरणावर सुनावणी पार पडली. शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावरच आक्षेप नोंदवत, नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कपिल सिब्बल यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया देत सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे.राहुल नार्वेकर यांना आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत, याचं भान राहिलेलं नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. विधानसभेचा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो. त्याची भूमिका पक्षविरहित असली पाहिजे. मात्र राहुल नार्वेकरांसारख्या व्यक्तीकडून अशा पद्धतीची अपेक्षा करणं चुकीचं असल्याचं जाधव म्हणाले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वकील कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली होती. सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात यातून काही सिद्ध होत नाही, असं नार्वेकर म्हणाले."मी जी भूमिका घेतली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले, त्या निकषांच्या आत राहून आणि त्याच आधारावर हा निर्णय दिला आहे. त्यांचे जे वकील असतील ते त्यांच्या संदर्भात युक्तिवाद करतील. याचा अर्थ असा नाही की ते जे म्हणत आहेत ते सत्य आहे."
"अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, हा पहिला प्रश्न आहे. असे बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे. या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही," असंही नार्वेकर म्हणाले.दरम्यान, भास्कर जाधव यांनी राज्यातील रस्त्यांच्या प्रश्नावरूनही सरकारवर टीका केली. "माझ्या मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी रस्ते केले, त्याला एकही खड्डा नाही. मात्र सध्याच्या सरकारमध्ये जे रस्ते झाले, त्या ठिकाणी रस्ते शोधावे लागतात," अशी टीका त्यांनी केली.
रस्ता कुठे आणि खड्डे कुठे, असा प्रश्न पडतो, असं म्हणत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव यांनी सरकारला लक्ष्य केलं. सध्याचे मुख्यमंत्री आपल्या पक्षातील नेत्यांचे निर्णय बदलत नाहीत, मात्र दोन्ही मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय सर्रास बदलण्याचं काम मुख्यमंत्री करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे पालक असतात. मात्र ही भूमिका आणि वागणं सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दिसत नाही, असं म्हणत मंत्र्यांच्या निर्णयांमध्ये होणाऱ्या बदलांवरूनही भास्कर जाधव यांनी टीका केली.
भरत गोगावले आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदावरूनही जाधवांनी सरकारवर निशाणा साधला. कुंभमेळा मंत्री असताना गिरीश महाजन यांच्या नातेवाईकांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री केलं असावं, असा टोला जाधवांनी लगावला.
तर मुंबई महामार्गावरील खड्ड्यांकडे भरत गोगावले लक्ष देणार आहेत म्हणून त्यांना पालकमंत्रीपद दिलं आहे. कदाचित नाशिकपेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठी गोगावले यांना पालकमंत्री केलं असावं, असा खोचक टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.




