सरकार विद्यार्थ्यांना घाबरलंय? NEET आंदोलनावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाची मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये त्यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घाबरल्याचा आरोप करत, संसद मोर्चाला परवानगी नाकारल्याबद्दल केंद्रावर निशाणा साधला.
राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "सरकार पोरांना घाबरलेय. डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली. शक्य असते तर जंतरमंतरवरील लाखो लोकांवरही कारवाई केली असती," असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच ED आणि इतर संस्थांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही पाच महत्त्वाची मेट्रो स्थानके तात्पुरती बंद ठेवली आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरात वॉटर कॅनन, दंगल नियंत्रणासाठी 'वज्र' वाहने आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परिसरात मोबाईल जॅमर्स बसवून इंटरनेट सेवा मर्यादित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.




