सोनम वांगचुक व नीट घोटाळा प्रकरण : जयसिंगपुरात भव्य कॅन्डल मार्च; "आंदोलकांवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय" ; राजू शेट्टींचा घणाघात
जयसिंगपूर: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेली कारवाई आणि 'नीट' (NEET) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात जयसिंगपूर शहरात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मूक मोर्चा पार पडला. "शांततेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे," असा घणाघाती हल्ला राजू शेट्टी यांनी यावेळी केंद्र सरकारवर चढवला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.
"सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशप्रेमींचा आवाज दडपणे घातक"
उपस्थितांना संबोधित करताना राजू शेट्टी म्हणाले, "विरोधी विचारांचा आणि मतांचा आदर करणे हेच जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशहितासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे." पुढे बोलताना त्यांनी NEET घोटाळ्यावर ताशेरे ओढले. "रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

समाजाने अन्यायाविरोधात एकत्र यावे: गणपतराव पाटील
दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी या वेळी अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन केले. "हा कॅन्डल मार्च कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. अन्यायाची कोणतीही घटना असो, समाजाने एकत्र उभे ठाकले पाहिजे," असे ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली. शहरातल्या प्रमुख मार्गांवरून शांततेच्या मार्गाने निघालेल्या या मोर्चाने जयसिंगपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.




