SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरे यांची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरे यांची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आणि शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार आदित्य ठाकरे यांची योगायोगाने भेट झाली. दोन्ही नेते वेगवेगळ्या कामानिमित्त SRA कार्यालयात आले असताना ही भेट झाली.

रोहित पवार यांनी SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन मुंबईतील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला. अनेक प्रकल्प 5 ते 10 वर्षांपासून प्रलंबित असून, रहिवाशांना घरभाडेही मिळाले नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

यावेळी रोहित पवार यांनी SRAमधील कार्यकारी अभियंते मिटकर आणि पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. एसटीपीसाठी आरक्षित जमीन नियमबाह्य पद्धतीने बिल्डरला देण्यात आल्याचा आरोप करत, न्यायालयाने निलंबनाचे आदेश दिल्यानंतरही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही हीच मागणी केली आहे. तसेच SRA आयुक्तांना 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, तत्काळ कारवाई झाली पाहिजे.

याशिवाय वरळीतील अॅट्रिया मॉललगतच्या सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या मौल्यवान जागेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून स्मारकाचा विकास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, SRAच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आणि अण्णाभाऊ साठे स्मारकासंदर्भातील काही मुद्द्यांवर रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी SRAच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा केली.