वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात येणार? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले

वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात येणार? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले

मुंबई (प्रतिनिधी) : सीजेपी प्रोटेस्टच्या वेळी सोनाक्षी सिन्हाने व्हिडीओद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तिने कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आपलं मत मांडलं. तसेच सोनम वांगचुक यांच्या उपोषणालाही तिने पाठिंबा दिला. या काळात सोनाक्षीने तयार केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान तिने मौन बाळगलं आहे.

सोनाक्षीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतंच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लेक सोनाक्षी सिन्हा राजकारणात प्रवेश करणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तर दिलं. आपल्या लेकीच्या राजकारणातील प्रवेशाबाबत शत्रुघ्न सिन्हा नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, सोनाक्षीने अलीकडेच झारखंडमधील मुलांना पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांना, ‘सीजेपीच्या आंदोलनादरम्यान तिने खंबीरपणे पाठिंबा दिला होता. या गोष्टी पाहता ती राजकारणात प्रवेश करेल, असं तुम्हाला वाटतं का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मी यावर ठोस असं काही सांगू शकत नाही. सुरुवातीला मी तिला विचारत देखील होतो.’ पुढे ते म्हणाले, ‘मी एवढं नक्की सांगू शकतो की, ती एका सक्षम वडिलांची सक्षम मुलगी आहे.’

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाला ट्रोल करणाऱ्यांवरही निशाणा साधला. ‘बरेच जण जे ट्रोल करतात, खरंतर ते पेड ट्रोलर्स असतात,’ असं त्यांनी म्हटलं. भाजपच्या आयटी सेलमधून सोनाक्षीच्या विरोधात ट्रोलिंग केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘ही एक ट्रोलिंग आहे. हे पेड ट्रोलर्स आहेत,’ असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं.त्यामुळे सोनाक्षी सिन्हा भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आता वाढली आहे. मात्र, याबाबत सोनाक्षीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनाक्षी राजकारणात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, तिला शेवटी ओटीटीवरील ‘सिस्टम’ या वेबसीरिजमध्ये पाहण्यात आलं. ही एक लीगल ड्रामा सिरीज होती. या सिरीजमध्ये अभिनेत्रीने वकिलाची भूमिका साकारली होती.सोनाक्षीच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात सोनाक्षी कोणत्या सिनेमात किंवा प्रोजेक्टमध्ये झळकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.