‘मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलणं राहुल गांधींना शोभत नाही’; हसन मुश्रीफांचा संताप
मुंबई (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावावी. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना एकेरी भाषेत बोलणं त्यांना शोभत नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सन्मान ठेवला पाहिजे, अशी टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, राहुल गांधी विरोधी पक्षनेते असतील, मात्र त्यांना कुणाचाही अपमान करण्याचा किंवा शिवीगाळ करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे वयाने मोठे आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान ठेवला पाहिजे, असं मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, मुश्रीफ यांनी इथेनॉल धोरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, इथेनॉल धोरण सर्वात आधी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना आणण्यात आलं. त्यामुळे त्याचं स्वागत केलं पाहिजे. इथेनॉल धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं भलं झालं आहे. राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचं नुकसान करून काय मिळणार आहे, हे मला माहिती नाही, असंही त्यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी मला गोविंद बागेतील उसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलावलं आहे. त्यावेळी मी पवार साहेबांना इथेनॉल धोरणाबाबत राहुल गांधी यांना समजावून सांगण्याची विनंती करणार आहे. राहुल गांधींना इथेनॉलच्या मुद्द्यावर शहाणं करा, असं पवार साहेबांना सांगणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचं काम इथेनॉलच्या पैशातून होत असल्याचं त्यांनी सांगितलं. धान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होतो. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचं नुकसान होतं, असं एकाही कंपनीने सांगितलेलं नाही. केवळ मायलेज थोडं कमी होतं, असं कंपन्यांनी सांगितल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, नंदुरबारच्या रस्त्यांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. महिन्यातून एक-दोन वेळा नंदुरबारला जात असतो. सुरतवरून नंदुरबारला जाण्यासाठी तीन तास लागतात. त्यापैकी दोन तास गुजरातमधील रस्ते चांगले आहेत, तर एक तास नंदुरबार जिल्ह्यातील रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळेच मी त्या दिवशी हे वक्तव्य केलं होतं.
नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. रस्त्यांच्या मुद्द्यावर विरोधक आंदोलन करणार, हे त्यांचं कामच आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही आता राज्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं मुश्रीफ म्हणाले.
पावसाळ्यानंतर ज्या पद्धतीने रस्त्यांवर खड्डे पडतात, ते टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सरकार येतात आणि जातात, कोणतंही सरकार आलं तरी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे पडणार नाहीत, असे दर्जेदार रस्ते तयार केले पाहिजेत, अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडली.




