'पांडुरंग पावला...!'; नाशिकच्या पालकमंत्रिपदाची घोषणा होताच गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
रायगडमध्ये भरत गोगावलेंची मारली बाजी
पुणे/नाशिक:गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य शासनाकडून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. महायुतीतील तीव्र रस्सीखेचीनंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे नेते गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेना (शिंदे गट) नेते भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

-
नाशिकमध्ये महाजनांकडे कमान: नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांकडून दावा केला जात होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर हे पद गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
-
रायगडमध्ये भरत गोगावलेंची बाजी: रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे तर शिवसेनेकडून भरत गोगावले उत्सुक होते. अखेर गोगावले यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले असून त्यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे.
-
पंढरपुरात विठ्ठल दर्शन अन् घोषणा: पालकमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा गिरीश महाजन पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडताच त्यांना ही बातमी समजली.
पालकमंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
"पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेतानाच मला नाशिकच्या पालकमंत्रिपदाची बातमी मिळाली, त्यामुळे मला खरोखरच 'पांडुरंग पावला' अशी माझी भावना आहे. या नियुक्तीबद्दल मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. नाशिकमधील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून सध्या आंदोलने सुरू आहेत, परंतु आम्हाला नाशिकचे रस्ते पूर्णपणे सिमेंटचे करायचे आहेत. कामाच्या काळात नागरिकांना थोडा त्रास होईल, पण नाशिक स्वच्छ आणि सुंदर बनेल. यापूर्वी मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम पाहिले आहे, आता पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करेन."




