जि.प. च्या बैठकीत शिंगणापूर शाळेसाठी सक्षम व्यवस्थापन संस्था नियुक्त करण्याच धोरण

जि.प. च्या बैठकीत शिंगणापूर शाळेसाठी  सक्षम व्यवस्थापन संस्था नियुक्त करण्याच  धोरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर (चंबुखडी, ता. करवीर) येथील उच्चस्तरीय धोरण व सनियंत्रण समितीची बैठक आज सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सदर बैठकीमध्ये  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीत अध्यक्ष व शिक्षण सभापती यांनी निवासी मुला-मुलींसाठी सुसज्ज व सुरक्षित वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या.

 

 तसेच शिक्षण सभापती यांनी प्रशालेतील क्रीडा शिक्षक, पहारेकरी, रेक्टर व स्वच्छता कर्मचारी हे विविध यंत्रणांमार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जात असल्याबाबत चर्चा केली. सदर सर्व मनुष्यबळासाठी स्वतंत्रपणे कंत्राट देण्याऐवजी एकाच सक्षम व्यवस्थापन संस्थेमार्फत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना देण्यात आली.      

विद्यार्थ्यांना अनुभवी क्रीडा शिक्षक, दर्जेदार भोजन व्यवस्था तसेच आवश्यक सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच भविष्यात काही अडचण अथवा वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याबाबत एक सक्षम व्यवस्थापन संस्था गरजेची असल्याबाबत चर्चा झाली.

 तसेच सदर बैठकीमध्ये मुला-मुलींसाठी नवीन स्वच्छतागृहांची सुविधा, निवासी प्रशालेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वर्ग-२ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती, निवासी क्रीडा प्रशालेतील विविध समित्यांवर नियुक्त्या, विद्यार्थ्यांचा विमा उतरविणे, नवीन क्रीडा व शैक्षणिक साहित्याची खरेदी आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

   सदर बैठकीस अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष; शिक्षण व अर्थ समिती सभापती शितल यादव बांधकाम व आरोग्य समिती सभापती महिला व बालकल्याण समिती सभापती  विद्या पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, प्राथमिक शिक्षणाधिकारी मिनाक्षी शेंडकर,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम कार्यकारी अभियंता  मानसिंग पाटील तसेच मुख्याध्यापक, मुख्य क्रीडा प्रशिक्षक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.