विरोधकांच्या दबावानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार; मात्र कधी बोलणार याबाबत अद्याप माहिती नाही
मुंबई (प्रतिनिधी) : गृहमंत्री अमित शाह दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावर सभागृहात उत्तर देणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, अमित शाह या मुद्द्यावर सविस्तर उत्तर देतील. मात्र, विरोधी पक्षाने कोणताही गोंधळ न घालता गृहमंत्र्यांचे उत्तर ऐकावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, अमित शाह नेमके कधी बोलणार, याबाबत रिजिजू यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

20 जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावं, अशी विरोधकांची मागणी आहे. अमित शाह यांनी संसद परिसराला नियमित भेट दिली असली, तरी ते सभागृहात उपस्थित राहिल्याचं दिसून आलं नाही. 20 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू असून, ते 13 ऑगस्ट रोजी संपणार आहे. अधिवेशनाच्या तीन आठवड्यांत सततच्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं आहे. पेपर लीक प्रतिबंधक विधेयकावरील चर्चेव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही.
दरम्यान, 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर अमित शाह यांनी संसदेत उत्तर न दिल्याने विरोधकांचा संताप वाढला आहे. गेल्या 15 दिवसांपासून विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अमित शाह यांना टॅग करत सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, "तेरा दिवस उलटून गेले, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून एक शब्दही आलेला नाही. माफी मागण्याऐवजी मोदी क्षमादान वाटत आहेत. अमित शाह, आम्ही जबाबदारीची मागणी करणे थांबवू, असं समजू नका. राजधानीच्या रस्त्यांवर मुलांना लाठीमार आणि पेलेट्सने मारहाण झाली आणि तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत. आज नाही तर उद्या, तुम्हाला या गुन्ह्यासाठी उत्तर द्यावेच लागेल. विद्यार्थी हे राष्ट्राचा प्रकाश आहेत आणि मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे."
राहुल गांधी यांनी आणखी एका पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा उल्लेख करत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, "आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही, असं मला प्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितलं. वर्षानुवर्षे तयारी, घर विकणे, आई-वडिलांचे कर्ज फेडणे आणि तरीही हातात काहीच नाही. हा त्याचा पराभव नाही. हा त्या व्यवस्थेचा पराभव आहे, जिने त्याच्या कष्टांना दाद देण्यास नकार दिला."
यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा अमित शाह यांच्यावर निशाणा साधत विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत सरकारला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे आता अमित शाह संसदेत नेमकं काय उत्तर देणार आणि विरोधकांच्या आरोपांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




