108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास प्रतीक्षा; अखेर गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांवर गुन्हा
मुंबई (प्रतिनिधी) : सरकारची तातडीची सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 108 रुग्णवाहिका सेवेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिंतूरमध्ये सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्यासह गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या महिलेसाठी 108 रुग्णवाहिकेसाठी तब्बल सात वेळा फोन करण्यात आला. मात्र, फोन करून दोन तास उलटूनही रुग्णवाहिका पोहोचली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणानंतर 108 रुग्णवाहिका सेवेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालक, संबंधित डॉक्टर तसेच स्त्री रुग्णालयातील डॉक्टर अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर शहरातील साठे नगर येथील मरजीनाबी अमीन शेख या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी 108 रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधला.
कुटुंबीयांच्या आरोपानुसार, रुग्णवाहिकेसाठी तब्बल सात वेळा फोन करण्यात आला. मात्र, दोन तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर महिलेला परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर महिलेच्या पतीने कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे रुग्णवाहिका चालक, संबंधित डॉक्टर आणि स्त्री रुग्णालयातील डॉक्टर अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात रुग्णवाहिकेसाठी करण्यात आलेले फोन, कॉल रेकॉर्ड, रुग्णवाहिकेचे लोकेशन, चालकाची भूमिका आणि रुग्णालयातील उपचार प्रक्रिया तपासली जाणार आहे. मात्र, याबाबत बोलण्यास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 108 रुग्णवाहिका सेवा नेमकी किती कार्यक्षम आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. "108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास प्रतीक्षा आणि अखेर 7 महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक आहे. सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? ‘इन्फ्रामॅन’ म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लक्तरं दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत आहे, हे चीड आणणारं आहे," अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.




