'FCRA बिलाला आमचा विरोध, प्रकरण JPC कडे पाठवा अन् NEET वर SIT बसवा'; खासदार सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी

'FCRA बिलाला आमचा विरोध, प्रकरण JPC कडे पाठवा अन् NEET वर SIT बसवा'; खासदार सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि आगामी विधेयकांवरून कडक भूमिका मांडली आहे. "परदेशी अंशदान (नियमन) कायदा म्हणजेच FCRA च्या सध्याच्या स्वरूपातील बिलाला आमच्या पक्षाचा पूर्ण विरोध असून केंद्र सरकारने यात घाई करू नये," अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पक्षाचे ८ खासदार सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

'घाई करू नका, बिल JPC कडे पाठवा'
संसदेत येणाऱ्या FCRA बिलाबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, "दिल्लीत FCRA बिल येण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्याच्या फॉर्ममध्ये या बिलाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्पष्ट विरोध आहे. माझी भारत सरकारला विनंती आहे की, या संदर्भात घाई करू नये. सरकारने हे बिल परत घ्यावे, किंवा ते मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंटरी समितीकडे (JPC) पाठवावे. एका सशक्त लोकशाहीमध्ये केवळ विरोध करून चालत नाही, तर चर्चा होणे गरजेचे असते. जर हे बिल JPC कडे गेले तर आमची चर्चेसाठी पूर्ण तयारी आहे."

 
NEET आणि पॅलेट गन वापराबाबत SIT चौकशीची मागणी
जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "विद्यार्थ्यांवर झालेला पॅलेट गनचा वापर आणि NEET प्रकरणाबाबत मी केंद्र सरकारकडे आधीपासून मागणी करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी पारदर्शक विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करून चौकशी झाली पाहिजे. नक्की काय घडले आणि पॅलेट गनचा वापर कोणी व का केला, हे प्रत्येक भारतीयाला समजले पाहिजे."

शेवटी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने FCRA बिलाबाबत सर्व पक्षांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा. जर सरकार सकारात्मक चर्चा करण्यास तयार असेल, तर यातून नक्कीच योग्य मार्ग निघू शकतो.