मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत ; आंदोलनाबाबत मुख्यमंत्री स्पष्टच बोलले...
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना संध्याकाळपर्यंतचीच परवानगी दिली असून, मैदानात एकावेळी ५,००० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला आश्चर्य वाटतं की हे आता कुणाला दिसतंय. याआधी काय घडलं, हे सर्वांनी पाहिलं आहे. आजही काही जण आंदोलनासाठी राजकीय संसाधनांचा वापर करत आहेत. आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नसून सामाजिक आहे. काही राजकीय पक्ष जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचं नुकसानच होईल, फायदा नाही.” या वक्तव्यानंतर फडणवीसांचा रोख नेमका कोणावर होता, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी केली, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. यानंतर जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांना दोन तासांत मुंबई रिकामी करण्याचे आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
जरांगे यांच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार विजयसिंह पंडित, राजू नवघरे, विलास भुमरे आणि प्रकाश सोळंके (सर्वजण अजित पवार व शिंदे गटाचे) हे आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर, महा विकास आघाडीतील आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी - शरद पवार गट), खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर (शिवसेना - ठाकरे गट) यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते आता आझाद मैदान सोडणार नाहीत. मात्र पोलिसांनी त्यांना फक्त संध्याकाळपर्यंतचीच परवानगी दिली आहे. जरांगे यांनी ही मुदत वाढवण्याची विनंती केली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांचा यावर काय निर्णय येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




