‘जुन्या झाडांची टिंगल नवी रोपं करत होती’; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर रोख कुणाकडे?
मुंबई (प्रतिनिधी) : अमरावतीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांचं आणखी एक व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत आलं आहे. “पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे.. इन्होने अभी तुफानो के झटके नही देखे..” असं स्टेटस नवनीत राणा यांनी ठेवलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांत नवनीत राणा यांचं हे दुसरं स्टेटस चर्चेत आलं आहे. त्यामुळे या स्टेटसमधून नवनीत राणांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे स्टेटस पक्षातील स्वकीयांना उद्देशून आहे की विरोधकांना, याबाबत नवनीत राणा यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. मात्र, आमदार रवी राणा आणि भाजप आमदारांमध्ये झालेल्या वादानंतर नवनीत राणा यांच्याकडून सोशल मीडियावर सातत्याने करण्यात येणाऱ्या पोस्टमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
यापूर्वी नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांच्या फोटोला कॅप्शन देत एक स्टेटस ठेवलं होतं. “दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है, लेकिन मै खेल नही खेल खेलने वाले बदल देता हु..” या स्टेटसमधूनही नवनीत राणा यांनी नेमका कोणाला इशारा दिला, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा “पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे.. इन्होने अभी तुफानो के झटके नही देखे..” या आशयाचं स्टेटस समोर आल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग आला आहे.
नवनीत राणा यांच्या नव्या स्टेटसमध्ये कोणत्याही नेत्याचं किंवा पक्षाचं नाव घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख भाजपमधील स्वकीयांकडे आहे की विरोधकांकडे, याचा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे, आमदार रवी राणा यांच्या एका वक्तव्यानंतर भाजपच्या तीन आमदारांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर नवनीत राणा यांचं हे स्टेटस समोर आलं आहे. त्यामुळे या स्टेटसचा संबंध याच राजकीय वादाशी जोडला जात आहे.
आमदार रवी राणा यांनी रविराज देशमुख यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला. रवी राणा यांनी “रविराज देशमुख यांचे आमदारकीचे तिकीट कापण्याचे काम मीच केले” असा दावा केला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेत रवी राणा यांचा दावा ठाम शब्दांत फेटाळून लावला. भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षातील उमेदवारीचा निर्णय केवळ भाजपच्या संसदीय मंडळाकडून घेतला जातो. त्यामुळे बाहेरील व्यक्तीने अशा प्रकारचा दावा करणे चुकीचे असून, रवी राणा यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं.
आमदार राजेश वानखडे म्हणाले, “भाजपमध्ये कोणाला तिकीट द्यायचे किंवा कापायचे, याचा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेते. आमच्या पक्षाबाबत बाहेरच्या व्यक्तींनी बोलू नये. कोणी असे दावे करत असेल, तर आम्ही सर्वजण एकत्रितपणे त्याला उत्तर देऊ.”
आमदार प्रताप अडसड यांनीही रवी राणा यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “भाजपमध्ये उमेदवारीबाबत अंतिम निर्णय संसदीय मंडळ घेते. ‘मी अमुक व्यक्तीचे तिकीट कापले’ असा दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. रवी राणा यांच्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाही. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद घेतली,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार प्रवीण पोटे यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “तिकीट कोणाला द्यायचे आणि कोणाचे कापायचे, हे संसदीय मंडळ ठरवते. बाहेरील व्यक्तीने या प्रक्रियेवर दावा करणे योग्य नाही. असा दावा पूर्णपणे खोटा असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असा घणाघात त्यांनी केला होता.




