उपसभापतीपदावर कोणाची लागणार मोहर? शिवसेनेत मोठी चुरस, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सभापती राम शिंदे यांनी 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे. महायुतीत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असले, तरी उपसभापतीपद शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या पदासाठी शिवसेनेतच मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या पुन्हा एकदा प्रमुख दावेदार मानल्या जात असल्या, तरी पक्षांतर्गत चर्चेत कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे, चंद्रकांत रघुवंशी यांच्या समर्थनार्थ उत्तर महाराष्ट्रातील नऊ आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना उपसभापतीपदाची संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षातील स्पर्धा अधिकच रंगली आहे.
मात्र, यापूर्वीही उमेदवारीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी अनपेक्षित निर्णय घेत अनेकांना धक्का दिला होता. त्यामुळे यावेळीही अंतिम क्षणापर्यंत नाव गुप्त ठेवून मोठे सरप्राईज देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे, विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. उमेदवारी अर्ज, छाननी आणि माघारीनंतर आवश्यक असल्यास 1 जुलैलाच मतदान आणि निकाल जाहीर होणार आहे.




