भाजपने कसला विकास केला? नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

भाजपने कसला विकास केला? नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

मुंबई (प्रतिनिधी) : गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? असा सवाल करत त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, "वाघ, बिबटे, जंगली प्राणी आणि साप हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही गडचिरोलीचा नक्षलवाद संपला असे म्हणत आहात, पण आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीत. ते अशा पद्धतीने मारले जात आहेत. तुम्ही आदिवासींचा कसला विकास करत आहात? त्यांना साप अथवा विंचू चावल्यावर उपचार मिळत नाहीत. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने जर या राज्याचे सरकार हळहळले नसेल, अस्वस्थ झाले नसेल, तर यासारखे निर्दयी सरकार नाही. या राज्यातील सरकारी शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था जाऊन बघा. तुमच्या विकासामुळे त्यांना काय मिळत आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

गडचिरोलीतील खाण उद्योगावरही संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "गडचिरोली जिल्ह्यात जो खाण उद्योग आहे, तिथे हजारो-लाखो वाहने चालत आहेत. त्या वाहनांखाली गेल्या वर्षभरात 1500 आदिवासी चिरडून मेले आहेत. एफआयआर नको म्हणून त्यांचे मृतदेहसुद्धा गायब केले जातात. पाच मिनिटांत ती बॉडी हलवली जाते, पाणी मारून रक्त साफ केले जाते आणि पुरावे नष्ट केले जातात. हा साधारण एक-दीड वर्षाचा आकडा आहे आणि याची नोंद कुठेही ठेवली जात नाही. जवळपास 1500 लोक मारले गेले आहेत," असा दावा त्यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री काय करत आहेत, आदिवासी विकास मंत्री काय करत आहेत? यासाठी तुम्हाला विकास हवा आहे का? तुम्ही आदिवासींना विस्थापित केले आहे. तिकडे कसला रोजगार आणताय, किती रोजगार मिळाला आहे? भारतीय जनता पक्षाचे देणगीदार, जे तुम्हाला लाच देतात, त्यांना तुम्ही गडचिरोलीचे जंगल, डोंगर आणि नद्या उद्ध्वस्त करायला दिल्या आहेत," असा आरोप त्यांनी केला.

आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरही राऊत यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, "आश्रमशाळांना जो निधी दिला जातो तो कुठे जातो? तो निधी कोण खात आहे? हे कोणाचे लोक आहेत? तीन मुलींच्या सर्पदंशाची घटना समोर आली, पण आतापर्यंत असंख्य मुले आणि मुली विंचू व सर्पदंशाने आदिवासी पाड्यावर मरण पावले आहेत. तिथे रुग्णवाहिका नाही, झोळीमध्ये रुग्णांना न्यावे लागत आहे आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करत आहेत, नरेंद्र मोदी विकासाच्या गोष्टी करत आहेत. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"नक्षलवाद कोणासाठी संपवला? तर या उद्योगपतींसाठी संपवला, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचा मृत्यू या मार्गाने सुरूच आहे. यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण झाला तर त्याला गोळ्या घातल्या जातात," अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

गडचिरोलीतील परिस्थितीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, "त्या मुलींची प्रकृती आता स्थिर आहे, मी आज सकाळीच माहिती घेतली. नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर अशा ठिकाणी आदिवासींच्या ज्या आश्रमशाळा आहेत, त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत. तिथे अशा प्रकारच्या विंचू आणि सर्पदंशाच्या घटना आठवड्यातून दोन ते तीन वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू रेकॉर्डवर आलेले नाहीत.

काल तीन मुलींच्या मृत्यूने मी इतका अस्वस्थ आहे की, महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? मी तर आदिवासींना सांगणार आहे की, गडचिरोलीत साप पकडा, मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा. मग त्यांना कळेल मृत्यूचे भय काय असते," असेही संजय राऊत म्हणाले.