'इनोव्हा'च्या मागणीवर मनसेचा उपरोधिक टोला; संदीप देशपांडेंनी खेळण्यातील गाड्या पाठवल्या गिफ्ट
मुंबई (प्रतिनिधी) : महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून नव्या 'इनोव्हा' गाड्यांच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खेळण्यातील इनोव्हा गाड्या खरेदी करून सत्ताधाऱ्यांना उपरोधिक भेट पाठवली आहे.

संदीप देशपांडे यांनी एका खेळण्यांच्या दुकानात जाऊन सहा इनोव्हा गाड्यांची मागणी केली. मात्र, दुकानात तीनच गाड्या उपलब्ध असल्याने त्यांनी त्या खरेदी केल्या आणि उर्वरित गाड्या नंतर पाठवण्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत खोचक टोला लगावला.
"उपमहापौर आणि वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना इनोव्हा गाडी हवी आहे. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्यासाठी मनसेकडून इनोव्हा पाठवत आहोत. आता गाडी पाहिजे म्हणून हट्ट करण्याची गरज नाही," असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
महापालिकेतील इनोव्हा गाड्यांच्या खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या खरेदीला विरोध दर्शवत मनसेकडून या खेळण्यातील गाड्या आकर्षक पद्धतीने पॅक करून महापालिका प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना कुरिअरद्वारे पाठवण्यात येणार आहेत.
मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची आणि उपरोधिक टीकेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.




