चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर गटाचा विजय; वडेट्टीवार समर्थकांना मोठा धक्का, गटनेतेपदाचा वाद संपला
मुंबई (प्रतिनिधी) : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या महत्त्वाच्या आदेशानंतर खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा दिलासा मिळाला असून, विजय वडेट्टीवार गटाला धक्का बसला आहे.

आयुक्तांच्या आदेशानुसार, वडेट्टीवार समर्थक राजेश अडुर यांची गटनेते म्हणून झालेली नोंद रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांची काँग्रेस गटनेते म्हणून नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेतील 16 नगरसेवकांच्या बहुमताने गटनेते बदलाचा ठराव मंजूर झाल्याने तो वैध असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. गटनेते बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींची पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
"लोकशाहीमध्ये नेता बहुमताने निवडला जातो, तो कोणावर लादला जात नाही," असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही विभागीय आयुक्तांनी नोंदवले आहे. तसेच, नगरपरिषद आणि महापालिका नियमांमध्ये गटनेते बदलण्यास कोणतीही बंदी नसल्याचा उल्लेख करत नागपूर खंडपीठाच्या निरीक्षणांचाही आधार आदेशात घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, 27 जुलै 2026 रोजी सुरेंद्र अडबाले यांची अधिकृतपणे काँग्रेस गटनेते म्हणून नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.




