रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; सीपी ऑफिसमध्ये फोन, संशयित आधी दोनदा भेटलेला
पुणे (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या समाधान हेल्पलाईन वर कॉल करुन महापौरांना धमकवण्यात आलं आहे. आशिष जमदाडे-पाटील नावाच्या व्यक्तीनं हा फोन केला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. ही व्यक्ती महापौरांना काही महिन्यांपूर्वी दोन वेळा भेटली होती. क्रीडा संबंधित काही काम घेऊन त्यांनी महापौरांची भेट घेतली होती. त्यानंतर आत्ता थेट जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली. भोसरी पोलिसांनी आशिष जमदाडेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो मानसिक तणावात असल्याचं दिसून आलं. त्यामुळं समज देऊन त्याला सोडण्यात आलं, अशी माहिती महापौरांनी दिली.

पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या व्यक्तीने थेट पोलीस आयुक्तालयाच्या (सीपी ऑफिस) 'समाधान हेल्पलाईन'वर कॉल करून ही धमकी दिली "मी रवी लांडगे यांना मारून टाकणार आहे," अशी भाषा या व्यक्तीने कॉलवर वापरली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला.
महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष जामदाडे पाटील असे आहे. तो मूळचा अहमदनगरचा असून सध्या चिखली परिसरात राहतो आणि भोसरी एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी तपास केला असता, संबंधित तरुणाचा घटस्फोट झालेला असून तो आई-वडिलांपासून वेगळा राहतो. या कौटुंबिक वादामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असून, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिसांनी फोटो पाठवल्यानंतर महापौरांनी या व्यक्तीला ओळखले. रवी लांडगे यांनी सांगितले की, साधारण दोन वर्षांपूर्वी ही व्यक्ती त्यांना दोनदा घरी भेटायला आली होती. त्यांच्या आजीच्या निधनानंतर तेराव्याच्या कार्यक्रमालाही तो आला होता आणि त्याने महापौरांना एक पुस्तकही भेट दिले होते. तो स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असून त्या संदर्भातील कामासाठीच महापौरांना भेटला होता. त्या भेटीदरम्यान अतिशय चांगला संवाद झाला होता, त्यामुळे त्याने असे का केले याबद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले होते. महापौरांनी सांगितले की, "या व्यक्तीने मला किंवा माझ्या कुटुंबाला थेट फोन करून धमकावलेले नाही, त्याने पोलिसांच्या हेल्पलाईनवर फोन केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला केवळ समज देऊन सोडून दिले आहे". भोसरी पोलिसांनी या तरुणाला ताकीद दिली आहे.




