आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले
मुंबई (प्रतिनिधी) : तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता अशी बोचरी टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर घणाघात केला आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, आता क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे ? असा सवाल करत असतानाच त्या म्हणाल्या की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा परिस्थिती काय होती? सुरुवातीचे लाभार्थी 2.53 कोटी होती. तर सुरुवातीचे बजेट 45,000 कोटी रुपये होते. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी हे 1, 48,60, 000 इतके आहे. तर 2026-27 बजेटमध्ये तरतूद हि 26,500 कोटी इतकी करण्यात आली आहे. तर संभाव्य अपात्र महिला या सुमारे 1.05 कोटी ठरल्या आहे. म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले. अशी टीका त्यांनी केलीय.




