20 वर्षांनंतर पद्मसिंह पाटील निर्दोष; अर्चना पाटील भावूक, "मंगळसूत्र हाती घेऊन गावोगावी फिरावे लागले"

20 वर्षांनंतर पद्मसिंह पाटील निर्दोष; अर्चना पाटील भावूक, "मंगळसूत्र हाती घेऊन गावोगावी फिरावे लागले"

मुंबई (प्रतिनिधी) : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणी तब्बल 20 वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.या बहुचर्चित प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. न्यायालयाने निकाल देताना खटल्याचा आधार असलेल्या माफीच्या साक्षीदाराची साक्ष पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याचे निरीक्षण नोंदवले आणि संशयाचा फायदा देत सर्व आरोपींची मुक्तता केली.

निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. त्यांची सून अर्चना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना गेल्या दोन दशकांतील संघर्ष आठवत भावनिक प्रतिक्रिया दिली."आमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक आणि राजकीय त्रास सहन करावा लागला. मुलं लहान असताना त्यांना तुरुंगात भेटायला जावं लागायचं. अनेक निवडणुकांमध्ये हा मुद्दा वारंवार उपस्थित केला गेला. मी स्वतः हातात मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत लोकांना आम्ही कोणाचा खून केलेला नाही, हे सांगत होते," असे अर्चना पाटील म्हणाल्या.

त्यांनी पुढे सांगितले की, गेली अनेक वर्षे कुटुंबावर मोठा मानसिक ताण होता. "आमची गेलेली वर्षे परत येणार नाहीत, मात्र आज न्यायालयाच्या निर्णयामुळे समाधान वाटत आहे," असे म्हणताना त्या भावूक झाल्या.दरम्यान, या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निकालापूर्वी न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र न्यायालयाचा निर्णय आरोपींच्या बाजूने लागल्याने या बहुचर्चित प्रकरणाचा एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे.