केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’चे उद्घाटन

केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’चे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : तांत्रिक शिक्षणाला जागतिक दर्जाची दिशा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठत कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात (KIT) जागतिक सॉफ्टवेअर कंपनी 'बेंटली सिस्टीम्स'च्या सहकार्याने बेंटली सेंटर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन या अत्याधुनिक सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर डिझाइन तंत्रज्ञान आणि उद्योगांमध्ये प्रत्यक्ष वापरले जाणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअर कॅम्पसमध्येच शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या अत्याधुनिक सेंटरचे उद्घाटन बेंटली सिस्टीम्सचे व्हाइस प्रेसिडेंट राहुल पाटील यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, विश्वस्त  भरत पाटील  सुनील कुलकर्णी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, बेंटलीच्या सिनियर मॅनेजर श्रीमती मोनिका जाधव, तसेच महाविद्यालयाचे विविध अधिष्ठाता विभागप्रमुख उपस्थित होते.

·         कौशल्याधारित शिक्षण: या प्रसंगी बोलताना सचिव श्री. दीपक चौगुले म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ पदवी देणे पुरेसे नसून उद्योगाला अपेक्षित कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. या सेंटरमुळे विद्यार्थी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी जोडले जातील आणि रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होतील.

·         उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी होणार: श्रीमती मोनिका जाधव यांनी बेंटली एज्युकेशन उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, जगभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वापरले जाणारे बेंटली इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग सॉफ्टवेअर आता केआयटीच्या विद्यार्थ्यांना शिकता येईल. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण रोजगारक्षम बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

·         डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन: बेंटली सिस्टीम्सचे व्हाइस प्रेसिडेंट श्री. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र पूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे, त्यामुळे सिव्हिल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.

·         प्रशिक्षणाचा टप्पा: संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी माहिती दिली की, या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बेंटलीच्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचे यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

भविष्यातील उपक्रम: ‘डिजिटल ट्विन कॅम्पस

सेंटरचे प्रमुख डॉ. रोहन नलवडे यांनी आगामी काळातील योजनांची माहिती देताना सांगितले की, पुढील टप्प्यात केआयटीमध्ये डिजिटल ट्विन कॅम्पस विकसित करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण कॅम्पसचे थ्री-डी (3D) डिजिटल मॉडेल तयार होईल, ज्यामुळे भविष्यातील नियोजन, देखभाल आणि व्यवस्थापन अधिक स्मार्ट, अचूक कार्यक्षम बनेल.

या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन, सचिव श्री. दीपक चौगुले तसेच सर्व विश्वस्तांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.