परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या; जरांगे-पाटील उपोषणाला बसूनही निर्णय न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या; जरांगे-पाटील उपोषणाला बसूनही निर्णय न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

परभणी: मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राहिल्याने आणि सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याच्या नैराश्यातून परभणीतील एका मराठा बांधवाने आत्महत्या केल्याची सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील रहिवासी गणेश साहेबराव भोसले असे या ३६ वर्षीय शेतकरी आंदोलकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्हा आणि मराठा समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला अनेक दिवस उलटूनही आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने गणेश भोसले काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. रविवारी त्यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली असून, "जरांगे-पाटील उपोषणाला बसूनही सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत नसल्याने मी हे पाऊल उचलत आहे," असा हताश मजकूर त्यात लिहिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सोमवारी सुहागन येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात गणेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा उघड्यावर पडलेला परिवार आहे. घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील आणि शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांनी भोसले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे जरांगे-पाटील मुंबई आंदोलनावर ठाम
एकिकडे या बलिदानामुळे समाजात संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने कूच करण्यावर ठाम आहेत. मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरी जरांगे-पाटील यांच्या वतीने ५० समर्थकांसह शांततापूर्ण आंदोलनासाठी तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत परवानगी न मिळाल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.