रोहित पवारांचा मोठा दावा! NEET फेरपरीक्षेचाही पेपर 3 दिवस आधी गुजरातमध्ये लीक? कागदपत्रांसह केली चौकशीची मागणी

रोहित पवारांचा मोठा दावा! NEET फेरपरीक्षेचाही पेपर 3 दिवस आधी गुजरातमध्ये लीक? कागदपत्रांसह केली चौकशीची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : देशात पेपरफुटीचा मुद्दा अजूनही शांत झालेला नसतानाच आमदार रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, NEET पेपर लीक प्रकरणानंतर घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचाही पेपर परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधी गुजरातमध्ये लीक झाल्याची माहिती समोर येत आहे.

या संदर्भात रोहित पवार यांनी सोशल मीडियावर काही कागदपत्रे आणि ई-मेलचे स्क्रीनशॉट शेअर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर हा दावा खरा असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असून, तपास यंत्रणांनी तातडीने याबाबत खुलासा करावा. तसेच, कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघड करावे.रोहित पवार यांनी शेअर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

दरम्यान, नीट पेपर लीक प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधक सातत्याने निशाणा साधत असून, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत, जर फेरपरीक्षेचाही पेपर लीक झाल्याचा दावा सत्य ठरला, तर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.