राईड कॅन्सल करणाऱ्या टॅक्सी चालकांवर सरकारचा चाबूक; प्रवाशांना मिळणार थेट भरपाई
मुंबई (प्रतिनिधी) : विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा रुग्णालयासारख्या अत्यावश्यक ठिकाणी जाण्यासाठी बुक केलेली टॅक्सी चालकाने शेवटच्या क्षणी रद्द केली, तर आता त्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या महाराष्ट्र मोटार वाहन एग्रीगेटर नियम, 2026 अंतर्गत अशा प्रकरणांमध्ये चालकाकडून नेहमीच्या दंडाच्या पाचपट रक्कम वसूल केली जाणार असून, ही रक्कम थेट प्रवाशाच्या ॲप वॉलेटमध्ये जमा केली जाईल.

सरकारने ओला, उबर, रॅपिडोसह सर्व ॲप-आधारित टॅक्सी सेवांसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार, चालकाने स्वीकारलेली राईड विनाकारण रद्द केल्यास त्याच्याकडून एकूण भाड्याच्या 10 टक्के किंवा कमाल 100 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. मात्र विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या प्रवासासाठी राईड रद्द केल्यास हा दंड पाचपट अधिक असेल.
नवीन नियमांनुसार, चालक नियोजित वेळेपासून 10 मिनिटांच्या आत प्रवाशापर्यंत पोहोचला नाही, तर ती राईड रद्द झाल्याचे मानले जाईल आणि संबंधित दंडाची कारवाई होईल. अशा महत्त्वाच्या प्रवासांसाठी अनावश्यक राईड रद्द होऊ नयेत यासाठी विशेष तांत्रिक यंत्रणा विकसित करण्याचे निर्देशही सरकारने एग्रीगेटर कंपन्यांना दिले आहेत.
प्रवासादरम्यान वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशाला पर्यायी वाहन उपलब्ध करून देणे आता कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. शहर किंवा महानगरपालिका हद्दीत 30 मिनिटांच्या आत, तर 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 60 मिनिटांच्या आत पर्यायी वाहन उपलब्ध करून द्यावे लागेल.
याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी कंपन्यांना 24 तास कॉल सेंटर, तक्रार निवारण यंत्रणा, लाईव्ह लोकेशन शेअरिंग, चालकाचा स्पष्ट फोटो आणि मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेत सेवा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नव्या नियमांनुसार चालकांना एकाच वेळी एकापेक्षा अधिक एग्रीगेटर कंपन्यांसोबत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पोलीस पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि मानसशास्त्रीय चाचणी पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.




