भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करताच अमित ठाकरे संतापले; एकच वाक्य म्हणाले, 'तुला..'

भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करताच अमित ठाकरे संतापले; एकच वाक्य म्हणाले, 'तुला..'

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील एका आलिशान इमारतीत विक्रीसाठी असलेल्या घराची जाहिरात करताना, हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही, असं वक्तव्य करणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची जोरदार झोड उठली होती. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही भावेश कावरे याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी भावेश कावरेच्या कार्यालयावर जाऊन दरवाजावर कोंबडीच्या पायांची माळ टांगली होती. या सर्व प्रकारानंतर भावेश कावरे रविवारी राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ'वर पोहोचला. याठिकाणी त्याने मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेतली.

या बैठकीत अमित ठाकरे यांनी भावेश कावरे याला चांगलेच खडे बोल सुनावले. “ती बिल्डिंग शाकाहारी घरांसाठी आहे, हे कोण बोललं तुला?” असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. त्यावर भावेश कावरेने सारवासारव करत, “नाही, ते फक्त फ्लॅटसाठी होतं,” असं उत्तर दिलं.

भावेशचं हे उत्तर ऐकताच अमित ठाकरे चांगलेच संतापले. “ते फ्लॅटसाठी नव्हतं फक्त, मी अख्खा व्हिडीओ बघितला तो. तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो,” असं अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.अमित ठाकरे यांचं हे वाक्य ऐकताच भावेश कावरे नरमला. “माझी चूक झाली,” असं त्याने म्हटलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी भावेशला त्याची चूक समजावून सांगत चांगलंच सुनावलं.

“तुला या गोष्टी कळल्या पाहिजेत. तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल? जिकडे आता कुठे मुंबईच्या प्रश्नांवर, अडचणींवर बोललं जातंय, तिकडे तू उगाच तणाव निर्माण केला. थोड्याशा पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी... सोडून द्या ना हे पैसे. भावेश, जिकडे तू चांगलं काम केलं, तिकडेच मी तुला बोलवलं होतं. मग तुला कळायला पाहिजे ना, आपण गोष्टी कुठे सोडल्या पाहिजेत,” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.

तसंच, “आता तू रिल करतोय कव्हर अप करायला, ते कळतंय. हे यापूर्वी केलं असतं तर मला बरं वाटलं असतं. मुंबईत खूप प्रश्न आहेत. लक्ष विचलित करायला तुझ्यासारखी मुलं वापरणार. म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं, धर्मावर, जातीवर जायचं नाही; मुलगा बोललाय त्यावर फोकस करा,” असंही अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“आमची ताकद रस्त्यावर एवढी आहे ना, वार तेवढा मोठा दिसतो. पण समोरच्याने केलेल्या उंगल्या दिसत नाहीत. मला तू केलेले स्पष्टीकरणाचे व्हिडीओही आवडलेले नाहीत. तू जे बोललाय ते अतिशय चुकीचं आहे. तू माझ्यासकट सगळ्या मुंबईकरांना दुखावलं आहेस,” असं अमित ठाकरे यांनी भावेश कावरेला सुनावलं.

त्यानंतर अमित ठाकरे यांनी भावेशला सर्वांची माफी मागण्यास सांगितलं. “त्यामुळे सगळ्यांची माफी मागायची आहे तुला आज. कारणं न देता. कळलंय,” असं म्हणत अमित ठाकरे यांनी भावेश कावरेला चांगलंच सुनावलं.