झोपडपट्टी क्षेत्रातील मिळकतींच्या कर आकारणीसाठी महापालिकेचे विशेष शिबिर
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील झोपडपट्टी क्षेत्रातील अद्याप कर आकारणी न झालेल्या मिळकतींची निव्वळ कर आकारणी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे विशेष शिबिर शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत घेण्यात येणार आहे. झोपडपट्टी क्षेत्रातील ज्या मिळकतींची अद्याप कर आकारणी झालेली नाही अशा मिळकतधारकांनी शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.

यासाठी मिळकतधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, लाईट बिल (असल्यास), पाणी बिल (असल्यास), झोपडपट्टी कार्ड (असल्यास) तसेच स्वयंघोषणापत्र/हमीपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सदर कर आकारणी ही केवळ निव्वळ कर आकारणीच्या सोयीसाठी करण्यात येत असल्याचे स्वयंघोषणापत्र/हमीपत्रामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
तरी शहरातील झोपडपट्टी क्षेत्रातील पात्र मिळकतधारकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या मिळकतीची कर आकारणी करून घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.




