ग्रीन डे उपक्रमात महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा - कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर (प्रतिनिधी) - पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत 'ग्रीन डे' च्या निमित्ताने आज महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आपल्या घरापासून महाराणा प्रताप चौकापर्यंतचा प्रवास कोल्हापूर परिवहन (के.एम.टी.) बसने केला. या निमित्ताने अधिकाऱ्यांनीही पर्यावरणपूरक प्रवासाची निवड करत प्रशासकांच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ हे सायकलवरून कार्यालयात आले, तर अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी पायी प्रवास केला. इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनीही सार्वजनिक वाहतूक, इलेक्ट्रीक वाहन, सायकल आणि पायी प्रवास करून 'ग्रीन डे' साजरा केला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपक्रमानुसार आज संपूर्ण जिल्ह्यात 'ग्रीन डे' व 'अर्थ मिनिट' उपक्रम राबविण्यात आला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी या निमित्ताने सर्व विभागांना ऊर्जासंवर्धन व पर्यावरणपूरक वर्तनाचे पालन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज कार्यालयात लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर, ई-ऑफिसद्वारे कामकाज, कागदाचा मर्यादित वापर, विजेचा वापर कमी ठेवणे आणि रात्री ८ वाजता १० मिनिटे वीज उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी ताराबाई पार्क येथील निवासस्थानातून पायी प्रवास करत मध्यवर्ती बसस्थानक येथील के.एम.टी. स्टॉप पर्यंत प्रवास केला. तेथून के.एम.टी. बसने महाराणा प्रताप चौकापर्यंत प्रवास करत नागरीकांशी आणि शाळकरी मुलांशी संवाद साधला. पुढे प्रशासक पायी चालत महापालिकेत आल्या.
या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, संख्यिकी अधिकारी संजय कुंभार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




