जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम; रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचा उपक्रम

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम; रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचा उपक्रम

कोल्हापूर: स्तनपान केवळ बाळासाठीच फायदेशीर नसून ते आईसाठीही अतिशय उपयुक्त आहे. आई आणि बाळामधील भावनिक बंध निर्माण करण्याव्यतिरिक्त स्तनपान दोघांसाठी आरोग्यदायी असते, असे प्रतिपादन रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा हॉस्पिटलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अजिबात दुर्लक्ष करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

 

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम आणि पंचगंगा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सौ. अरूंधती महाडिक, डॉ. तेजश्री तहसिलदार, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष प्रदीप भारमल आणि सचिव अतुल भालेकर प्रमुख उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार पहिल्या ६ महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचे दूधच द्यावे, असे सांगत सौ. अरूंधती महाडिक यांनी हे दूध बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम असल्याचे नमूद केले. तसेच रोटरीच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, मातृत्व आणि नवजात बालकांच्या कल्याणासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाबद्दल घ्यावयाची काळजी याविषयी डॉ. तेजश्री तहसिलदार यांनी सविस्तर माहिती दिली.

रोटरी क्लबचे सामाजिक कार्य व हॉस्पिटलचा गौरव

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या माध्यमातून सन २०१८ पासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा डॉ. विद्या काळे यांनी घेतला. रोटरीच्या सहकार्यामुळे पंचगंगा हॉस्पिटलसाठी बेबी वॉर्मर मशिन, बेड, महिलांसाठी स्वच्छतागृह, ऑपरेशन थिएटरमधील पार्टीशन आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. या भरीव सहकार्यामुळेच पंचगंगा हॉस्पिटलला राज्यातील प्रथम क्रमांकाचे हॉस्पिटल म्हणून गौरव प्राप्त झाल्याचे डॉ. काळे यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान अरूंधती महाडिक आणि डॉ. तेजश्री तहसिलदार यांच्यासह अन्य मान्यवरांनी हॉस्पिटलची पाहणी करून नुकत्याच प्रसूती झालेल्या मातांची विचारपूस केली आणि त्यांना ड्रायफ्रूट्सची पाकिटे भेट दिली. याप्रसंगी सचिन कुलकर्णी, विश्वजित जाधव, संभाजी जाधव, राहुल राबाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.