ना. रामदास आठवले यांना शिक्षक समितीने टीईटी संदर्भात दिले निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी) - आज सर्किट हाऊस कोल्हापूर येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांना टीईटी परीक्षेसंदर्भात निवेदन सादर केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान मोलाचे असून मी NCTE (राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद) यांच्याशी TET बाबत चर्चा करतो. आणि महाराष्ट्रातील शिक्षकांना दिलासा निश्चित देईन," असे आश्वासन दिले. त्यांना दिलेल्या निवेदनातील मजकूर असा: -शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संबंधाने सामाजिक व मानवीय दृष्टिकोनातून निर्णय घेण्याबाबत.

राज्यातील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्याचा मा. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी निर्णय दिला असून ज्यांना सेवेत पाच वर्षापेक्षा कमी कालावधी आहे त्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यातून सूट देतानाच पदोन्नतीसाठी मात्र परीक्षा अनिवार्य केली आहे. तसेच पाच वर्षापेक्षा अधिक सेवा असणाऱ्या शिक्षकांना दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन घातले असून; परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवामुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र केंद्र शासनाने वेळोवेळी विहित केली शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करूनच आणि निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण शिक्षक सेवेत आले आहे. शासनाच्या आजवरच्या TET बाबतच्या शासन निर्णयात २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET उत्तीर्ण करण्याचे कुठेही आदेश नाहीत.
मात्र न्यायालयाच्या निर्णयाने लक्षावधी शिक्षक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. याबाबत शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या संबंधाने संरक्षण मिळावे यासाठी "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती" ने राज्य शासनाकडे - (१) सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची (२) प्रभावित होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सामाजिक, मानवीय दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेण्याची मागणी संदर्भित निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर राज्य प्रमुख सुधाकर सावंत, पुणे विभाग प्रसिद्धीप्रमुख हरिदास वर्णे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, महिला जिल्हाध्यक्षा संगीता अस्वले, कार्याध्यक्ष गणपती मांडवकर, जिल्हा प्रतिनिधी मारुती पाटील, राज्य प्रतिनिधी शरद केनवडे, करवीर चे अध्यक्ष गजानन मोरे, सरचिटणीस बाबा धुमाळ,संतोष पाटील,रामचंद्र बुवा,रमेश कोरवी ,संजय जितकर, बालाजी पांढरे,संजय कडगावे यांच्यासह आदी उपस्थित होते.




