कोल्हापुरात पावसाची संततधार ; शिंगणापूर बंधारा पाण्याखाली, वाहतूक बंद

कोल्हापुरात पावसाची संततधार ; शिंगणापूर बंधारा पाण्याखाली, वाहतूक बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या महिनाभरापासून चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील जनतेला अखेर दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्यातील शिंगणापूर बंधारा यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी
जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. मात्र, गेल्या चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचे पाऊल
शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याचे पाहताच प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली असून, वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.