विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला? तेजस्वी यादव रस्त्यावर, राजदचा राजभवनावर मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमधील सिवानमध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या AK-47 गोळीबाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तेजस्वी यादव रस्त्यावर उतरले. त्यांनी पाटणा येथील जेपी गोलंबरपासून राजभवनापर्यंत मोर्चाचे नेतृत्व केले. सुमारे 5 किलोमीटरच्या या मोर्चात पाच हजारांहून अधिक समर्थक सहभागी झाले होते. तेजस्वी यादव यांनी समर्थकांसह डाक बंगल्याजवळील बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी इन्कम टॅक्स चौकात पाण्याचे फवारे मारले आणि तेजस्वी यादव यांना ताब्यात घेतले.

यावेळी तेजस्वी यादव म्हणाले, "मला तुरुंगाची भीती नाही. आपले भगवान श्रीकृष्ण तुरुंगात जन्मले होते. जो कोणी सत्तेवर आहे तो जाणारच."मोर्चादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्याही फेकल्या. काही कार्यकर्ते लाकडी AK-47 घेऊनही आले होते. एएसपी (कायदा आणि सुव्यवस्था) कृष्ण मुरारी प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना ध्वजाचा आदर करण्याचे आणि लाठीचार्जचा वापर विचारपूर्वक करण्याचे निर्देश दिले.
तेजस्वी यादव तब्बल पाच वर्षांनंतर निषेधासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये बिहार सरकारच्या एका प्रस्तावाच्या निषेधार्थ ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची सचिवालय पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली.यानंतर तेजस्वी यादव यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, "जोपर्यंत मुख्यमंत्री जबाबदारी निश्चित करत नाहीत, संपूर्ण घटनेबाबत निवेदन जारी करत नाहीत, दोषींना न्याय मिळवून देत नाहीत, गोळीबाराचा आदेश कोणी दिला हे जनतेसमोर उघड करत नाहीत, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि बेरोजगारी दूर होत नाही, तोपर्यंत आम्ही लढा देत राहू."
दरम्यान, आरजेडीच्या राजभवन मोर्चाबाबत पाटणाचे आयजी जितेंद्र राणा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "राजभवन मोर्चा गांधी मैदानापासून सुरू झाला आणि आयटी चौकात संपला. प्रतिनिधी मंडळाला लोक भवनातून भेटीची वेळ मिळाली आहे. तेथे ते आपल्या मागण्या मांडतील. ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यापैकी काही जण लोक भवनाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. जमावावर पाण्याचे फवारे मारण्यात आले."




