दिल्लीत 'चलो संसद' आंदोलनाला हिंसक वळण! विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार
मुंबई (प्रतिनिधी) : राजधानी दिल्लीत 'चलो संसद' आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. काँग्रेस जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या या आंदोलनाला आता अत्यंत हिंसक वळण लागलंय. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून सोनम वांगचुक आमरण उपोषणावर असतानाही सरकारने संवाद साधला नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. आज हाच उद्रेक दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसद परिसरात पाहायला मिळाला.

आंदोलक विद्यार्थी संसदेच्या अवघ्या १५० मीटर अंतरावर पोहोचले असता, दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अमानुष बळाचा वापर केला. सीजेपीने (काँग्रेस जनता पार्टी) केलेल्या गंभीर आरोपानुसार लाठीमारात तब्बल ४० ते ५० विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आली असून अनेक जण रक्तबंबाळ झाले आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थिनी आणि एका १२ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना पोलिसांनी केसांना धरून खेचल्याचा अत्यंत धक्कादायक आरोप पक्षाने ट्विटर (X) वरून केला आहे.अनेक तरुणांना रस्त्यावर पाडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
सध्या दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवर आणि मेट्रो स्टेशनवर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संसद परिसरात मोठ्या प्रमाणात बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. आंदोल चिरडण्याच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच भडकला आहे.
दरम्यान, आंदोलक नेते अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. काँग्रेस जनता पार्टीनेही ट्वीट करत अभिजीत पोलिसांच्या ताब्यात नसल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान, सोनम वांगचुक यांनी केलेल्या आवाहनानंतर अभिजीत दिपके यांनी आपलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे.
मात्र, पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि झालेल्या लाठीमारामुळे दिल्लीतील तणाव शिगेला पोहोचला असून, सरकार आता यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




