रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; भाजपचा प्रस्ताव महासभेत मंजूर, नियम मोडणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद

रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; भाजपचा प्रस्ताव महासभेत मंजूर, नियम मोडणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद

मुंबई (प्रतिनिधी) : मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारती आणि हाउसिंग सोसायट्यांमध्ये आता कुर्बानी देण्यासोबतच बकरा पाळण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपने मंगळवारी झालेल्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव बहुमताच्या आधारे मंजूर केला आहे. प्रस्तावानुसार, सोसायटी परिसर, घर, दुकान आणि रस्त्यावर बकरा पाळणे किंवा कुर्बानी करणे यावर प्रतिबंध राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यासोबतच गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मीरा-भाईंदरमध्ये सणांच्या काळात सोसायट्यांमध्ये बकरा पाळणे आणि कुर्बानी देण्यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. एखाद्या रहिवाशाने सोसायटीमध्ये बकरा आणल्यास इतर रहिवाशांकडून विरोध केला जात असल्याने अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनांमुळे शहरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन राजकीय वातावरणही तापले होते.

अशातच स्पष्ट नियमांच्या अभावामुळे प्रशासनासमोर कारवाई करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महासभेत मांस विक्रीशी संबंधित नियमावलीवर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपकडून सोसायटी, घर, दुकान आणि रस्त्यावर बकरा पाळणे तसेच कुर्बानी करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या बहुमतामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मात्र, या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे. काँग्रेसने मागणी केली की, ज्या सोसायट्यांमध्ये सर्व रहिवाशांची संमती असेल, त्या सोसायट्यांना बकरा पाळण्यास किंवा सोसायटी परिसरात कुर्बानी करण्यास या प्रतिबंधातून वगळण्यात यावे. काँग्रेसने यासंदर्भात प्रस्तावही मांडला. मात्र, बहुमत न मिळाल्याने तो नामंजूर करण्यात आला.

महासभेत मंजूर झालेल्या प्रस्तावामुळे आता मीरा-भाईंदरमधील सोसायट्या, घरे, दुकाने आणि रस्त्यांवर बकरा पाळणे तसेच कुर्बानी करण्यावर निर्बंध येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिकेच्या ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात 43 वर्षीय राहुल साबळे या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पार्वती इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदार कंपनीत कार्यरत असलेले चार कर्मचारी 18 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रभाग कार्यालयाच्या छतावरील रोषणाई काढण्यासाठी गेले होते. पत्र्याच्या शेडवर चढून काम करत असताना राहुल साबळे यांचा अचानक पाय घसरला. ते खाली कोसळल्याने गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दापोडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.काम करताना सुरक्षेच्या उपकरणांची आणि योग्य काळजीची झालेली पायमल्ली एका निष्पाप कामगाराच्या जीवावर बेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप आणि दुःख व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.