'गोकुळ'च्या ठरावधारक कर्मचारी, संस्था कर्मचारी व कंत्राटदारांनी घाबरू नये; संचालक युवराज पाटील यांचे प्रसिद्धीपत्रक
सर्व ठराव पात्रच होणार; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे ठरावधारक कर्मचारी, प्राथमिक दूध संस्थांचे कर्मचारी आणि कंत्राटदारांनी कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट आवाहन गोकुळचे संचालक युवराज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संबंधित सर्व ठराव कायदेशीररीत्या पात्रच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संचालक युवराजपाटील यांनी पत्रकात नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने अवसायनातील संस्थांना पात्र करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक गाडे यांनी विभागीय सहाय्यक उपनिबंधक देविदास मिसाळ यांना कायदेशीर प्रक्रियेचे तंतोतंत पालन करण्याचे पत्र दिले आहे. मात्र, या पत्राचा चुकीचा अर्थ लावून काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत.
निवडणूक प्राधिकरणाच्या पत्रात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४, संस्थेचे उपविधी तसेच सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशांचे पालन करूनच अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार मतदानाचा अधिकार मिळणार
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या कच्च्या मतदार यादीमध्ये या कर्मचाऱ्यांचा व कंत्राटदारांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना अंतिम (पक्क्या) यादीतून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सहकारी कायदा किंवा 'गोकुळ'च्या उपविधीमध्ये अशा प्रकारे ठराव अपात्र करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार सर्वांना मतदानाचा अधिकार नक्कीच मिळेल, असे सांगत अखेर 'सत्यमेव जयते' असा विश्वास संचालक युवराज पाटील यांनी व्यक्त केला.




