मुंब्रा हे कोणाच्या बापाचे पाकिस्तान नाही; नितेश राणे आक्रमक
मुंब्रा: मुंब्रा हे नाव मुंब्रा देवीवरूनच पडले असून हे आपल्या हिंदू राष्ट्रात आहे; हे कोणाच्या बापाचे पाकिस्तान नाही," अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंब्र्यातील सभेत विरोधकांवर घणाघाती टीका केली. मुंब्र्यातील कोणत्याही हिंदू बांधवाने किंवा भगिनीने भीतीपोटी येथून पलायन करू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मुंब्रा येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार कार्यरत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हिंदू समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कोणालाही घाबरण्याचे किंवा आपले घर सोडून जाण्याचे अजिबात कारण नाही.
कावड यात्रेप्रमाणेच राज्यातील सर्व हिंदू सण-उत्सव अत्यंत उत्साहात आणि भगवामय वातावरणात साजरे केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंब्र्यातील हिंदू समाजाने एकत्र येऊन आपले सण आणि परंपरा अभिमानाने साजऱ्या कराव्यात, असेही राणे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.




