मतदार यादीतील गोंधळावरून महाविकास आघाडी आक्रमक ; निवडणूक आयोगाकडे तक्रारी
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततांवर लक्ष केंद्रित करत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेत फेरफार आणि गोंधळ होत असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. त्यांनी याआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरही गंभीर टीका केली होती.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, तसेच ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदार याद्यांतील त्रुटींबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, “चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत आणि मतदार याद्यांतील त्रुटी दाखवण्यासाठी आम्ही सर्व नेते येथे आलो आहोत. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना पुरावे दाखवले असून, राज ठाकरे यांनी देखील अनेक उदाहरणे सादर केली आहेत. १ जुलैपर्यंतची मतदार यादी 'फ्रिज' करून जर निवडणुका घेण्यात आल्या, तर याच चुका कायम राहतील. त्यामुळे आम्ही यादीवर हरकत घेतली आहे आणि आयोगाने आमच्या शंकांचं निरसन करावं, अशी आमची मागणी आहे.”
जयंत पाटील पुढे म्हणाले, “११७ वर्षाच्या व्यक्तीला ४० वर्षांचा मुलगा दाखवण्यात आला आहे, काही मतदारांची नावं चुकीच्या पद्धतीने आहेत, पत्ते अपूर्ण आहेत, काही घरांमध्ये अनेक व्यक्ती नोंदवण्यात आल्या आहेत. या चुका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे याद्या दुरुस्त कराव्यात, ही आमची ठाम मागणी आहे.”
तसेच, माजी आ. अशोक पवार यांनी मतदार यादीविषयी माहिती मागवली असता, शिरूरचे निवडणूक अधिकारी म्हणाले की, “ही माहिती गोपनीय आणि वैयक्तिक आहे, त्यामुळे ती उघड केली जाणार नाही.” ही भूमिका अत्यंत चिंताजनक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “आमचं म्हणणं उद्या निवडणूक आयुक्त आणि चोक्कलिंगम समोर मांडलं जाईल. सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार आहे. यावेळी VVPAT प्रणाली लागू करण्याची आमची मागणी असून, आयोगाने ती नाकारली आहे. या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा होईल.” तसेच, “देशभरात सीसीटीव्ही बसवले असले तरी काही ठिकाणी प्रायव्हसीचा भंग झाला आणि बूथ कॅप्चरिंगच्या घटना घडल्या आहेत. सध्या कोणत्याही मतदारसंघाचं नाव घेणार नाही, पण उद्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करू,” असंही पाटील म्हणाले.
शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले की, “देशातील निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष राहाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भाजपनेही केरळ, बंगाल आणि कर्नाटकात अशाच मागण्या केल्या आहेत. त्यामुळे या विषयावर भाजपने आमच्यासोबत यावं, असं आम्हाला वाटतं. हा राजकीय दौरा नाही, तर निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी केलेला प्रयत्न आहे.”
राऊत पुढे म्हणाले, “चोक्कलिंगम यांच्याशी संबंधित काही निर्णय अद्याप प्रलंबित आहेत. उद्या दुपारी १२ वाजता पुन्हा बैठक होणार असून, राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे देखील उपस्थित राहतील. आजची चर्चा अपुरी राहिल्याने उद्या पुढील निर्णय होतील.”




